Wednesday, February 10, 2016

माझ्यातला "मी"


माझ्यातला  "मी"
आज तुझ्या आठवणींनी पहाड उभा केला,
क्षणात एका, आसवांच्या सागराने, त्याला त्यात बुडवला    

लगेचच आशेच्या स्वप्नांनी, एक होडी तयार केली
बघता बघता भुर्रकन, ती चार वर्ष मागे गेली    

छान छान आठवणींचे टप्पे, मी सहज पार केले,
काही टप्याने तर मला, अगदीच गार केले    

आता माझी होडी , थोडी संथ झाली होती,
सुखाचा डोह पार करून, वेगळीकडेच भरकटली होती    

अश्यातच गैरसमजुतीच्या वादळाने मला,
 भर समुद्रात गाठले, 
थोड्या वेळचे बे-मोसमी ढग बरसत असतील
असे मला वाटले

एकट्याने मी त्या वादळाशी दोन हात केले,
ते वादळ गेले आणि दुसरेच वादळ आले

अशी कित्येक वादळे पेलत पेलत 
मी समुद्र पार केला 
कदाचित त्या वादळांनीच,
मला समुद्रा बाहेर यायला आधार दिला

आता समुद्र पण संपला होता
आणि
पहाड पण दिसत नव्हता
कारण आता माझ्यातल "तुला" शोधण संपल होत
आणि 
माझ्यातल्या "मी" चा नवीन प्रवास सुरु झाला होता .
………. नितीन माळी


Sunday, February 7, 2016

गणेश फार्म , राजापूर


     
   


                       अगं ये, ऐक ना, "दुपारी तीन नंतर राजापूरला, आज जाऊन येयीन, ते आपल्या धनकवडी पासून थोड्या अंतरावर आहे, एकाने पशुपालनाचा मोठा व्यवसाय केलाय म्हणे, पंधरा एक…म्हैशी आहेत अस ऐकले आहे, जरा जाऊन बघून येऊ म्हणतोय एकदा, कस काय आहे ते, माहिती काय देतोय का बघून येतो म्हणतोय" मी दात साफ करत करत बायकोच्या कानावर आजचा बेत टाकला आणि अंघोळीला गेलो.

"हं", ती एवढेच बोलून तिच्या कामाला लागली.

अंघोळ झाल्यावर चहाची वाट बघत बघत पोरांच्या खोलीत डोकावून पाहिलं, पोर उशिरा पर्यंतं झोपली होती.
"ओ राजेश खन्ना, अमिताभ बच्चन उठा आता, अजून किती वेळ झोपणार? आईने चहा केलाय, उठा उठा लवकर" मी आवाज दिला, पण पोरं एका आवाजात उठतील तर ती पोर कसली? मग मी चहा घ्यायला निघून गेलो.

चहासोबत बायकोने "हे आणायचे आहे उद्या लागेल" असे म्हणत किरण मालाची चिठ्ठी पुढे केली, मी न वाचताच ती घडी घालून पाकिटात ठेवली आणि शेतात कामाला लागलो.

ठरल्या प्रमाणे तीन नंतर मी आवरले, आणि गाडीला किक मारून राजापूर च्या दिशेने निघालो.

जाताना पुढे रस्तात गावातल्याच एका किराणा दुकानात बाजाराची चिठ्ठी दिली, "हा माल भरून ठेव मी घरी जाताना घेऊन जाईन", एवढे सांगून मी राजापूर च्या दिशेने निघालो. तास भरात म्हैशी बघून, थोडी माहिती घेऊन निघायचे ह्या विचाराने जाता जाता डोक्यात प्रश्न गोळा करत मी धनकवडी पार करून तासात राजापूरची वेस पार करून पोहोचलो एकदाशी राजापूरला.


संबंधीत माणसाचे नाव पत्ता माहित नव्हते, ते विचारायला गावात एका चहाच्या टपरी जवळ जाऊन मी त्या बद्दल विचारपूस केली,

"तो गण्या का "? चहा वाल्याने मला विचारले!

"मला नाव माहित नाही पण पंधरा बर म्हैशी पालन करणारा राजापूरचा कोण तर आहे बघा".

"तो गाण्याच!, गावात त्यानेच एवढ्या म्हशी पाळल्या हायत्या" !

"इतुन मोठ्या रसत्याला वळा, थोडंसं पुढ गेला कि आतल्या आंगाला गणेश फार्म चा पिवळा बोर्ड हाय बघा! , मोठा हाय बोर्ड, दिसलच बघा!

बर! बर! म्हणत मी गणेश फार्म चा पिवळा बोर्ड शोधत शोधत फार्म वर पोहचलो. समोरच दोन कुत्यानी जोर जोरात भुंकत माझे स्वागत केलं.

"हां गप्पं , चल ये "हाऱ्या ", "नाऱ्या " चल य बघू माघारी ", असा आवाज आला.

" कोण पायजे"? एक सडपातळ चाळीशीतला पुरुष त्या कुत्र्या ना बाजूला घेत मला विचारले.
मी वडगावचा, नारायण तोडकर, फार्म बघायला आलो आहे. मालक तुम्हीच का?
न्हाय, न्हाय मालक हाईत आत म्हंदी, चला म्होर आलोचं.

समोरच मोठा वाडा होता, जुनं लाकडी बांधकाम होत.
वाड्याच्या बाहेरूनच मी आवाज दिला "कोण आहे का" ?
"आलो आलो " म्हणत कोणितर दरवाजा उघडतं आवाज दिला ,
तोच बाहेर आल्यावर बघतो तर काय?
माझा बालमित्र गणेश !!

"आरे गणेश तु"? मी आश्चर्याने विचारले,
"कोण नारायण तोडकर का "?
हो!
आयला, तू नाऱ्या ओळ्खलां न्हाइस,
य, य, आत ये, गण्यां बोलत बोलत मला वाड्यात आत घेऊन आला,

वाड्याच्या सुरुवातीलाच बैठक व्यवस्था होती, "लै दिसांन भेटलास गड्या" असे म्हणत गण्याने बसायला जागा केली, थांब आलोच असं मला म्हणत, बायकोला आवाज देत आतल्या खोलीत गेला,
मी वाड्यात इकडे तिकडे पाहत बसलो, माझी नजर भिंतीवर गेली. फेट्यात, काळ्या टोपीत एका म्हातार्या माणसाचे हार घातलेले अनोळखी फोटो लटकवले होते, तेवड्यात गण्या पाण्याचा तांब्या घेऊन आला,

"लै दिसानं आलास गड्या, वळखनास बी आता", पाण्याचा तांब्या पुढ करत गण्या बोलला ,
एक प्रकारचा आश्चार्यीत आनंद गण्याच्या चेहर्यावर दिसत होता.

"होय, खूप दिवसाने भेटतोय आपण, पण मला माहित नव्हते तूच आहेस म्हणून"!
म्हंजे?
अरे राजापूर ला कोणीतरी मोठा म्हैशी पालन व्यवसाय करतेय असे ऐकले होते, मला पण थोडे माहिती करायची होती म्हणून विचारात विचारात आलो.

कुठं अस्तूस हाल्ली? जत्रेत एकदा घावलास त्यावर आता, वडगावलाच अस्तु का? गण्यान विचारलं
"हो हल्ली वडगावलाच असतो" मी उत्तर दिलं

(तेवढ्यात गण्याची बायको चहा घेऊन येते)

गण्या बायको कडे बघत, ह्यो बघ… , माझ्या शाळेतला नारायण, वडगावचा
मी "नमस्कार" !
गाण्याची बायको (नुसताच हात जोडून ), एकटच आलाय व्हय? आणि मंडळी?
"होय, काम होते म्हणून एकटाच आलोय", एवढे ऐकून गाण्याची बायको आत गेली.

"राक्या, रम्या, विष्णू, जाधवाचा विज्या भेटत्यात का"? गण्या ने जुन्या मित्रांची विचारपूस केली
"नाही, कोणालाच भेटलो नाही"
"तू मुंबई ला अस्तूस असं संत्या निकम म्हणाला व्हता",

"सहा महिन्या पूर्वीच आलो सर्व सोडून एकदाची आपल्या गावी",
आता गावातच राहणार आहे, दुसरीकडे काम करायची इच्छा नाही, स्वतःच काय तर करायचे म्हणतोय म्हणून तुझा म्हीशीपालन बघायला आलोय.

लै भारी गड्या, नोकरीत काय बी नाय बग, चल तुला मळा, म्हशी, बाग दाखवतो,

"हो चल तेच पाहायला आलो आहे",
असे म्हणत आम्ही दोघेही वाड्या बाहेर पडलो, आता माझा मला थोडा आधार वाटू लागला, मनात कुठलीच परकी भावना उरली नव्हती,आता बिनधास्त खूप काही विचारू शकतो असे वाटू लागले आणि हे फक्त गण्या माझा पहिल्यापासूनचा मित्र होता म्हणून.

पाच वाजले होते , गप्पा मारत मारत आम्ही मळ्यात पोहचलो, आधी गण्याने मळा फिरवून दाखवला, ऊस, केळीच्या बागा, कांदा, मेथी, वांगी चे प्लॉट पहिले, हे सर्व पाहताना गण्या त्याच्या लागवड खर्चा पासून ते बाजार भावा पर्यंत सर्व आकडे मला सांगत होता, मलाही त्याचे कौतुक वाटत होते, नंतर आम्ही म्हैशीचा गोठा पहिला, मुऱ्हा दिल्ली जातीच्या वीस म्हैशी होत्या दावणीला, मोठ्या, काळ्याकुट्ट रंगाच्या, धिप्पाड अश्या सर्वच होत्या, त्यांची व्यवस्था पण कमालीची होती, प्रशस्त दावन, मोठा शेड, दोन कामगार चोवीस तास देखणीला, वैराणीची व्यवस्था, शेण मूत्र चे पण पद्धतशीर व्यवस्थापन शेतातच गोबरगॅस प्लांट बसवला होता त्याचा डोलारा मी पाहतच बसलो, कमी शिक्षण घेतलेल्या गन्याचे कर्तृत्व मला माझ्या पेक्ष्या खूपच मोठे वाटत होते.

"गण्या खूपच मोठा व्याप आहे लेका तुझा, कसे मॅनेज करतो हे सर्व,

किती खर्च केलास, कस काय जमलं तुला हे सगळे? मी त्याला विचारू लागलो, कारण माझ्यासमोर आर्थिक जुळवा जुळव हाच एक मोठा प्रश्न होता.

"आर त्य सम्द तुला सांगतो निवांत बसून, चल वाड्यावर आधी",

मी घड्याळ पहिले, जवळ जवळ सात वाजत आले होते, मी लवकर जायची घाई केली हे गाण्याला कळाल, त्याने आज रात्री मुकाम करण्याचा गळ घातला.

"नाऱ्या , लेका लई दिसान आलायस, आज कोंबड कापतो, ऱ्हां कि गड्या, वैनीला फोन लाव सांग उद्या एतो ".
त्याच्या आग्रहाला मी नाही नाही म्हणत शेवटी राजी झालो आणि घरी निरोप देऊन मी तिचेच राहीलो .

रात्री गाण्यान वाड्याबाहेर झाडाखाली "दारू आणि कोंबड्याची" जुळणी केली होती.
गार वाऱ्यात, जुन्या गोष्टी बोलता बोलता आम्ही प्यायला बसलो , आमचे दोन पेग कधी झाले कळलच नाही.

दुसर्याच पेगलाच मी हालू लागलो,
दारू पोटात गेली, डोकं झिंगवायला लागली, जीभ अडखळत अडखळत थोडी वैयक्तीक होऊ लागली ,

"गन्या , मुंबई ला सहा वर्ष नोकरी करून मी अक्षरश्या वैतागलो होतो रे , कमी पगार, फिक्स काम नाही, भाड्याची खोली, दोन मुले. कसंतरी भागायचं आमच. गावच सगळे सोडून आई बाबा मुंबई ला येणार नाही म्हणाले, आमच्या विना काहीच अडले नाही त्यांचे, पण मनात राहून गेलं… जीवाची मुंबई करत करत जिवाभावाची माणस सुटली, अक्षरशा नको झाली होती ती मुंबई. "जीवाच्या मुंबई" मध्ये आता पहिल्यासारखा "जीव" लागेना म्हणून सहा महिन्या पूर्वीच आलो सर्व सोडून एकदाची आपल्या गावी. आता शेती, व्यवसाय करायचा म्हणतो, तुझ्या सारखा!!

तू देरिंगबाज गड्या, कस केलस, कस जमावलंस?


गण्याचा तीसरा पेग चालू होता, गण्याला पण आता थोडी झिंग येऊ लागली होती ,

"कस्ल काय घिऊन बसलास ! , काम केलं तर होतंय कि समद "

" पण डेरिंगबाज तर हुतोच पैंल्या पसनं",

गण्या थोडा भूतकाळात गेला, कदाचित दारू तीच काम करत होती.

"आठवीत व्होतो तेव्हाच संगी च येडं लावलं हुत, त्याच नादात पार खुळा झालो व्होतो, शाळंमाग एकदा तिचा हात धरला हुता, गावबर बोंबल्ली हुती ती ,

माझ्या बा नं पडुस्तर मारला मला, पण संगीचा नाद न्हाय सूटला!

म्होरं अकरावीला गेल्यावर बा ला वाटल सुधारलो पण कस्ल काय"!!
अस म्हणत गण्याने चौथा पेग लावला तोंडाला!

"कॉलेजात पण ती सोबतच आली, येता जाता मला नखरं दाऊ लागली, बोलायची आदून मदुन ती , मग तर म्या लैच ....
ग्लास मधला घोट पित पुढचं शब्द राहून गेलं.

तुला म्हणून सांगतूं एकदा संगीच्या घरा जवळच्या उसात तिला वडली, त्य हणम्यान पाहिलं, गावबर तमाश्या झाला र !!! संगीला आणि मला लै हाणला माझ्या अन तिच्या बा न.

संगीच तिच्या बा न लांब लगीन लाऊन दिलं. माझ कॉलेज सुटल , घरात दोन म्हशीची चार झाली, मळा, जनावरे हेच आलं नशीबी, नायतर संगीला घिउन मी पण मुंबई ला असतो बग ….

गण्याला संगी न मिळण्याचे दुखः आजपण त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत. मी जाऊदे गण्या होत असं म्हणत त्याची समजूत काढली.

म्होरं आमच्या बा न त्याच्या मैतर ला म्या जावाय म्हणून करून घी म्हणून लई गळ घातली, त्यान पण मोठ्या मनान माझ त्याच्या एकुंती एकं पोरी सोबत लगीन लाऊन दिलं,

"सासरा मेल्यावर इकडचं अन तिकडच म्याच सांभाळलं, चार म्हशी ची वीस केली, बाग लावली, जमीन वाढवली, गावात कुणाकड पण नाय एवढ कमावतोय बग "

" होय खरं आहे बघ ! मी म्हणालो.

"तू पण कमीवशील रं ! म्या हाय मदतीला, काम करायची तयारी ठेव, म्होरंचं म्होरं बघू" !! गण्यान मला धीर देत देत शेवटचा ग्लास भरला, आणि मी होय होय म्हणत ग्लास रिकामा केला.

त्याच्या एवढ्या वाक्याने माझ्या खचलेल्या मनाला आता थोडा धीर आला होता, कित्येक दिवसाने जीवाभावाच कोण तरी आहे, असे भासत होत आणि काम करायची उर्जापण मिळाली असे वाटत होतं.

दोघांनी पण प्यायचं संपवून भाकरी आणि देशी कोंबडीवर ताव मारला, आणि झाडाखाली बाजल्यावर, गार वाऱ्यात शरीराला विचारमुक्त करून एका चीर शांतीच्या निद्रेत झोकून दिलं !!!!
                                                                                                    ……… नितीन माळी 

 

Monday, February 1, 2016