Sunday, April 30, 2017

महात्मा बसवेश्वर यांच्या ९१२ व्या जयंती



आपल्या भारताचा इतिहास तसा खूपच रंजक आणि गौरवशाही राहिलेला आहे. अश्या इतिहासात अनेक समाजसुधारक, युगपुरुष होऊन गेले. अश्या महापुरुषांची आजही ह्या जगाला गरज भासत राहते कारण त्यांनी केलेले कार्य हे सहज नव्हते, आज ही भले भले त्यांच्या सारखं कार्य करू शकत नाहीत, असेच एक महापुरुष ९०० वर्षांपूर्वी होऊन गेले ते म्हणजे विश्वगुरु जगतज्योति महात्मा बसवेश्वर. आज त्यांची ९१२ वी जयंती…त्यानिमित्त थोडक्यात त्यांच्या कार्याचा परिचय.

१२व्या शतकामध्ये भारतीय समाज विशेष करून दक्षिण भागातील समाज हा अनेक परंपरा, रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता, भेदभाव, स्त्री दास्यत्व, जातीयता इत्यादींनी त्रस्त झालेला, मरगळलेला होता. अशा परिस्थितीत त्या काळात समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे धाडस महात्मा बसवेश्वरांनी केले. मान, अपमान, कष्ट, टीका सहन करीत त्यांनी प्रस्थापितां विरुद्ध मोठा संघर्ष उभा केला. यासाठीच बरेचजण त्यांना १२व्या शतकातील पुरोगामी तर काहीजण विद्रोही महात्मा असेही म्हणतात.
महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक होते. महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. त्यांनी शोषणविरोधी, भेदभावविरोधी, जातीभेदाविरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवली. महात्मा बसवेश्वरांनी चातुवर्णाला विरोध केला. वर्णभेद, जातीभेद नुसतेच नाकारले नाही तर त्यावर त्यांनी सडकून टीकाही केली.

महात्मा बसवेश्वर यांचा जन्म ११०५ मध्ये बागेवाडी (जि. विजापूर) कर्नाटक येथे वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाला.  (जन्म तारीख आणि वर्ष या विषयी मतभेद आहेत पण खूप संशोधना अंती इतिहास संशोधक डॉ पी बी सावंत यांनी ११०५ हेच वर्ष ठरवले आहे)
दरसाल त्याच दिवशी देशभरात बसवजयंती साजरी केली जाते, खास करून कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार, बसव कल्याण (कर्नाटक) येथे ही जयंती जोरदार साजरी केली जाते. १९१३ मध्ये कर्नाटक गांधी म्हणून ओळखले जाणारे हर्डेकर मंजप्पा यांनी दावणगेरे (कर्नाटक) येथे पहिली सार्वजनिक बसव जयंती साजरी केली.
महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धता निर्माण करण्यासाठी त्यांनी समाजाला “कायक वे कैलास” आणि “दासोह” अश्या दोन क्रांतिकारक संकल्पना दिल्या.

मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना हे त्यांच्या कायक वे कैलास सिद्धांताचे सार होय. शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे. कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हे हीन दर्जाचे नाहीत, असे सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढविली. कायक हे केवळ पैशासाठी सांगितलेले नाही. तसेच ते कर्मसिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसायस्वातंत्र्य देण्यात आलेले आहे.
श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी, ही विचारसरणी (दासोह ) मांडल्यामुळे बसवेश्र्वरांची वृत्ती समाजवादी, समतावादी होती, असे दिसून येते. दासोह सिद्धांतात आपण कमावलेले धन केवळ स्वतः पूरते न वापरता त्याचा समाजासाठी उपयोग करण्याची संकल्पना त्यांनी मांडली.

बसवेश्र्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना, विशेषतः ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला.

बसवेश्वरांच्या काळात समाजव्यवस्थेत स्त्रीला शुद्र, बहिष्कृत समजले जात असे. स्त्रीयांवर अन्याय होत होता, म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य केले. स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क दिले. स्त्रियांची अशुद्धतेच्या कल्पनेतून आणि पंचसुतका पासून सुटका केली.
तत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांच्या पुढाकाराने १२ व्या शतकात घडला. मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला.
असा आंतरजातीय विवाह तो ही १२ व्या शतकात हे खूपच क्रांतिकारक आणि धाडसी होतं कारण आजही म्हणजे ९०० वर्षांनंतरही आपल्या समाजाची असा विवाह स्वीकारण्याची पूर्ण मानसिकता झालेली नाही.

सवेश्र्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली शिवानुभवमंटप म्हणजेच अनुभवमंटप ही संस्था जागतिक धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. हे त्या काळातील पहिले लोकशाहीचे संसद होते. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण येथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. ही चर्चा लयबद्ध गद्यातून होत असे. तत्कालीन शिवशरण-शरणींची अशी वचने पुढे संग्रहीत करण्यात आली. मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. वचन साहित्यातून त्यांनी समाजात प्रबोधनरूपी विचार पेरले.


दोन वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लंडन मध्ये थेम्स नदीच्या काठी बसवण्यात आलेल्या बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या अनावरन संध्येच्या भाषणात याच गुणांचा जगासमोर जाहीर गौरवही केला होता.
 आता परत हे मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्या नुकतेच २३ भाषेत रूपांतरित झालेलं असून येत्या २८ एप्रिल २०१७ रोजी बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे “वचन साहित्य” देशाला समर्पित करण्यात येत आहे.

 -नि. मा. 

Sunday, April 9, 2017

"ऊन जरा जास्तच आहे, दरवर्षी वाटतं "


"ऊन जरा जास्तच आहे, दरवर्षी वाटतं "

 



 दरवर्षी जसजसा एप्रिल-मे जवळ येतो तेव्हा उन्हाळा जरा जास्तीच आहे असं सगळ्यांनाच वाटतं. हिवाळ्यात हवा हवा असणारा सूर्य मात्र उन्हाळ्यात नको नको वाटतो, आमच्या काही फेसबुक मित्रांनी उन्हाळाचं रद्द व्हावा अशीही गमतीने मागणी केली होती.

अभ्यासायला सूर्य तसा खूप छान तारा आहे, मला जाम आकर्षण आहे याच, युनिव्हर्स मध्ये अद्भुत आहे, सर्वांनाच माहित आहे, सूर्य आहे म्हणून तर पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे.
या उन्हाची गम्मत सांगतो आज ह्या क्षणाला जो उन्हाचा चटका लागतोय, जो प्रकाश , उष्णता आपल्याला मिळतेय त्याची उत्पत्ती हि लाखो वर्ष्यापूर्वी झालेली असते.

सूर्याच्या मध्य केंद्रभागेत निर्माण होणारी ऊर्जा 'प्रकाश आणि उष्मा ' याच्या रूपाने बाहेर पडते (याला फोटॉन म्हणतात). सूर्य एवढा मोठा आहे की ही ऊर्जा बाहेर पृष्ठभागावर यायला तब्बल 1लाख 70हजार एवढे वर्षे लागतात.

सूर्याच्या विशालतेची अजून एक गोष्ट सांगतो, आपण मानवाने आतापर्यंत ऊर्जेसाठी जो मोठा प्रकल्प बांधलाय त्यातून आपण फक्त 22 हजार 500 मेगावॉट ऊर्जा निर्मिती करू शकतोय.
सूर्याची ऊर्जा किती आहे माहीत आहे का? 38 हजार करोड मेगावॉट तेही प्रति सेकंदाला सूर्य निर्माण करतोय   म्हणजे सूर्य  किती विशाल ऊर्जा निर्माण करतो ते पहा , आपल्याला हे सर्व फुकट देतोय सूर्य.

पण हा सूर्य खूप काळ असंच ऊर्जा देत राहील का? सूर्य काय आहे, कसा आहे , त्याचे आयुष्य किती आहे? हे हि आपण पाहू.
शास्त्रज्ञ असं सांगतात की सूर्याचा जन्म 4.5 अरब वर्ष्यापूर्वी झालाय. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम यापासून बनलेला मोठा गोळा आहे. याचे बाह्य आवरण हे हायड्रोजन, हेलियम, लोह, सिलिकॉन, सल्फर, मॅग्नेशियम, ऑक्सिजन, कॅल्शियम, क्रोमियम या तत्वांपासून बनलेलं आहे
सूर्याचं मध्यकेंद्रिय (core) तापमान 1 करोड 56 लाख ℃ आहे आणि बाह्य आवरणाचे तापमान 6000℃ आहे .
शास्त्रज्ञ काही वर्ष्यापूर्वी असं मानत होते की, सूर्य सामान्य इंधना सारखं जळत राहतोय, पण मग त्यांना एक प्रश्न पडायचा कि हे असं असेल तर इंधन संपत का नाही? 1920 मध्ये ह्यावर अजून अभ्यास केल्यावर त्यांना कळालं कि हि एक Nuclear Fusion प्रोसेस आहे. या nuclear fusion वर सध्या जोरात काम चालू आहे, हे काम यशस्वी झालं की मानव जातीला कधी न संपणार्या इंधनाचा स्रोत मिळेल. सध्या युरोप, चीन, जपान, रशिया, अमेरिका आणि भारत हे संयुक्तिकपणे यावर काम करत आहेत.
( हि तीच प्रोसेस आहे ज्याच्या आधारे हायड्रोजन बॉम्बचं  काम चालतं) .

सूर्याच्या मध्यभागी हायड्रोजन कण प्रचंड दबावाखाली असतात. यां कणांची एकमेकांशी टक्कर होऊन हेलियम जन्माला येते. म्हणजे प्रत्येक सेकंदाला 6570लाख टन हायड्रोजनच6530लाख टन हेलियम मध्ये रूपांतर होतं , या प्रोसेस मध्ये जवळ पास 40 लाख टन हायड्रोजनच रूपांतर होतच नाही, त्याच रूपांतर ऊर्जेत होत. हीच ऊर्जा अवकाशात चारीबाजूला पसरली जाते.


संशोधक असं सांगतात की ही सूर्याची प्रोसेस अजून 5 अरब वर्ष चालेल, त्यानंतर सुर्यामधील हायड्रोजन समाप्त होईल, त्यामुळे कोअर तापमान प्रचंड वाढेल ,यामुळे सूर्याचा आकार आहे या पेक्ष्या 100 पटीने वाढेल (याला red giant म्हणतात) असं झालं तर सूर्य पहिला बुध आणि शुक्र या ग्रहांना खाऊन टाकेल आणि मग त्यानंतर आपली पृथ्वी. पण तो पर्यंत आपल्या पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टीचा विनाश झालेला असेल. तिथून पुढे हजारो वर्षे सूर्यात फक्त हेलियम शिल्लक राहिलेलं असेल. मग ते हेलियम कार्बन मध्ये रूपांतरित होईल, त्यामुळे सूर्याचा आकार अजून वाढेल. हे होत असताना त्याच्या बाह्य आवरणाचे तुकडे पडायला सुरुवात होऊन तो शेवटी पृथ्वी एवढा गोळा शिल्लक राहील. आता त्याची ऊर्जा एवढी असेल की ती मोजनेही शक्य नसेल. सूर्य फक्त पांढरा तारा म्हणून शिल्लक राहिल. त्याचे तापमान असेच वाढत राहून पुढे तो जळून जळून कोळश्यासारखा होईल आणि अश्या प्रकारे सूर्याचा अंत होईल.

हे लगेच होणार नाही, हे पाहायला आपण जिवंत हि नसू. हे व्हायला 5 अरब वर्ष लागतील.
सुर्यासारख्या कित्येक ताऱ्यांचा अंत झाला आहे आणि नव्याने जन्म हि झाला आहे. अवकाशात हि आरंभ आणि अंत ची क्रिया अशीच अविरतपणे चालू रहाणार आहे.

-नितीन माळी