Thursday, May 11, 2017

खगोलशास्त्र भीती आणि आवड

खगोलशास्त्र भीती आणि आवड


आपण भारतीय एका महान संस्कृतीचे वारसदार आहोत हे मान्य जरी केले तरी त्यातील कितीतरी चुकीच्या गोष्टी आपण डोळे झाकून फॉलो करतं असतो हे हि मान्य करायला हवं .

खगोलशास्त्राबद्दल माझं असंच अनुमान आहे, आम्हाला जास्तीत जास्त खगोलशास्त्र कशातून माहिती होतं तर ते ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र इत्यादि शास्त्राच्या माध्यमातून. मी जर डॉ. चंद्रशेखर, डॉ जयंत नारळीकर, डॉ नितीन शिंदे यांना वाचले नसते तर मीही खगोलशास्त्र, वैज्ञानिक चष्म्यातून कधीच पहिले नसते. या लोकांच्यामुळे आज मी विश्वाची सफर त्यांच्या लेखणीतून करतोय.

आपला कलच तसा असतो, बघाना, गॅलिलिओ ने 1609 मध्ये दुर्भिणीतून चंद्र, शुक्र, गुरु, सूर्य या ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण केले होते, पण आज 21व्या शतकात तंत्रज्ञान असूनही आपल्यापैकी किती लोकांनी असं दुर्भिणीतून खगोलीय आविष्कार पहिले आहेत? बोटावर मोजण्याइतपत ! इथं आवड तरी कोणालाय म्हणा?
अथांग पसरलेल्या आंतरिक विश्वाच्या पसाऱ्यात आपण मानव खूपच नगण्य आहोत तरीही ग्रह आमच्या आयुष्यावर परिणाम करतात अशी आपली श्रद्धा आहे.

शिकल्या सवरलेल्या लोकांना अजून हि लग्न करायला 36 गुण जुळवायला लागतात. संकष्टी आजही आम्ही चंद्र बघूनच सोडतो, नशीब समजा आपण गुरु ग्रहावर नाही, कारण गुरु ग्रहाला 63 चंद्र आहेत, आपल्या पृथ्वी ला एक चंद्र आहे तर आपण महिन्यातून एकच संकष्टी करतो, गुरु वर असतो तर महिन्याला 63 संकष्टया करायला लागल्या असत्या, म्हणजे दिवसातून दोन उपवास, बापरे! उपवास करणाऱ्या लोकांचं काय झालं असतं ते चंद्रच जाणे !!

सूर्यमालेत सर्वात तेजस्वी असलेला शुक्र ग्रह आम्हाला "शुक्र तारा मंद वारा " किंवा "उगवली शुक्राची चांदणी " या अश्या फिल्मी गाण्यातून जास्ती समजतो.

उघड्या डोळ्यांनी रात्री दिसणाऱ्या शनी ग्रहाला आम्ही वाकड्या नजरेचा ग्रह मानतो. पाण्यापेक्षा हलका असलेला हा ग्रह (पाण्याची घनता 1 gm/cm3 आणि शनीची 0.7 gm/cm3 आहे) आज भल्या भल्यांच्या तोंडचं पाणी पळवतो. एकतर 12 राशीपैकी 3 राशींना साडेसाती लावतो म्हणजे भारतातील 25%लोकांना शनी साडेसाती लागलेली असतेच (हे फक्त भारतीयांना बरका !इतर लोकांना असले मंगळ बिंगळ काही नाही).

अभिषेक आणि ऐश्वर्यासारख्या शिकलेल्या किंवा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांनी कडक मंगल चा सॉफ्ट मंगळ करून लग्न केलं, तिथं आम्ही तुम्ही म्हणजे काहीच नाही.

ज्योतिषानी बदनाम केलेला तांबड्या रंगाचा मंगळ हा एकमेव ग्रहच भविष्यात आपल्याला राहण्याचा आसरा असणार आहे. भविष्यात जर ग्लोबल वार्मिंग, बायो-न्यूक्लिअर युद्ध किंवा पृथ्वीवरील लोकसंख्या वाढलीच तर पहिली धाव मंगळावर करण्याच्या तयारीत असलेलो आपण मात्र पत्रिकेत जरी मंगळ आला की पहिली धाव ज्योतिष्याकडे घेतो.
त्या बिचाऱ्या मंगळाला साडेसात कोटी किलोमीटर एवढ्या अंतरावरून माहित हि नसेल कि त्याची शांती महाराष्ट्रातल्या अमुक गावातील तमुक जोतिष्याने घातलेली आहे !! त्याला हे हि माहित नसते कि त्याची आणि शनीची परस्पर युती घडवून मंगळ शांतही करता येतो , आहे की नाय कमाल !!

राहू केतूला तर आम्ही अमरीश पुरी आणि शक्ती कपूरच समजतो. कालसर्प योग्य म्हणजे महाभयंकर योग. राहू ते केतू असा मोठा साप समजून राहू हे सापाचे तोंड, तर केतू हे त्याचे शेपूट. पत्रिकेतील सर्व ग्रह राहू केतूंच्या एका बाजूला आले तर काल सर्प योग्य. यावर उपाय काय तर नारायण नाग बळी! म्हणजे काट्याने काटा काढणे. च्यायला त्या सापांना सुद्धा माहित नाही कि ते इतके पॉवर फुल्ल आहेत.

अधिक मासाचे खूळ हि असेच, आम्हाला जगासोबत बरोबर येण्यासाठी वर्ष्याला 11 दिवस कमी पडले म्हणून तीन वर्षाने 33 दिवसांची वाढ म्हणजे एक महिना पंचांग वाढवण्यात आले. आता हे नाकारावे तर समस्त जावई लोकांशी वाण नाकारण्यावरून मला शत्रुत्व घ्यावे लागेल.

पृथ्वी स्वतः भोवती फिरते हे सत्य विज्ञान आपल्याला तीसरीपासून सांगतेय तरी आम्ही वास्तू पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण बघून बांधतोय. म्हणजे 24 तासात आपले किचन, बेडरूम, देवघर, टॉयलेट सगळं 24 तासात स्वतः भोवती एक फेरी पूर्ण करतात, मग काय उपयोग आहे दिशा पाहून बांधकाम करायची? तरी ही आपण बांधलेली घरे फोडून परत वास्तुशात्राच्या नियमाने दुरुस्त करत सुटलोय, किती अडाणीपणा हा.

आपण अजून किती आणि कुठवर अश्या अंधश्रद्धा जोपासणार आहोत हे माहित नाही. इथं शिकलेले हि तिथेच आणि अशिक्षित पण तिथेच आहेत.

एका वाचनात आले होते, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, इंग्रजांनी स्वातंत्र्य जाहीर केल्यावर 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 12 वाजता नेहरू ते स्वीकारणार होते पण भारताने रात्री 12 वाजता स्वातंत्र्य स्वीकारू नये असं धर्मपंडितांचे मत होते. का तर त्या दिवशी आमावस्या होती. त्यावर नेहरू म्हणले होते आज स्वातंत्र्य स्वीकारले नाही तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांच्या हौतात्म्याशी हि प्रतारणा ठरेल. हुतात्मे अमावस्या बघून झालेले नाही, काहीही असो, स्वातंत्र्य रात्री 12 वाजता स्वीकारले जाईल.आणि त्यांनी तसेच केले.
एवढा वैज्ञानिक दृष्टीकोन आपण ठेवला असता तर.... !!

असो!! नेहरूंनी हा दृष्टिकोन ठेवला हेही नसे थोडकेच!
 
-नि.मा