Monday, July 24, 2017

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सरकारी संस्थांचा निधी


"देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सरकारी संस्थांचा निधी सरकार ने कमी केलाय" , या विषयावर वृत्तपत्रातील संपादकीय पासून ते सोशल मीडियापर्यंत अनेक चर्चा वाचायला मिळाल्या. खरं तर त्या एकअंगी वाटल्या, अश्या महत्वाच्या विषयावर फक्त वरवर न बघता, त्यांच्या खोलात उतरणे गरजेचे आहे, काही लोकांना अश्या संस्था कोणत्या आहेत, त्या काय काम करतात, किंवा त्यांनी आतापर्यंत काय शोध लावले यापैकी काहीही माहित नसताना फक्त काही आरोपांचा संदर्भ घेऊन त्यावरून राईचा पर्वत करताना दिसत आहेत.

सुरुवातीला आपण हि गोष्ट मान्य केली पाहिजे की ग्लोबल टर्मचा विचार करता आपल्या देशातील "विज्ञान आणि तंत्रज्ञान" क्षेत्रातील संस्थांवर आपला एकूण खर्च आपल्या बजेट नुसार खूपच कमी आहे. संशोधनासाठी देऊ केलेली आर्थिक तरतूद हि सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 1 टक्केच्या आसपास सुद्धा नाही. आपल्या अश्या पॉलिसी का आहेत किंवा तश्या त्या असाव्यात का? किंवा त्यात बदल करायला हवा का? आपल्या प्राओरिटी बदलायला हव्यात का? हा दुसरा मुद्दा आहे. खरं तर यावर आपण बोललं, लिहलं पाहिजे.

तर मूळ मुद्यावर बोलूया, अश्या सर्व संस्थांचा निधी कपात केलेला नाही, काही विशिष्ट संस्थांचा नक्कीच केलाय. का केलाय त्याला हि अनेक कारणे आहेत. तुम्ही दुसरी बाजू समजून घेणे गरजेचे आहे. केवळ  एका किंवा दोन वर्ष्याच्या निधी वाटपावरून सरकार वर आरोप प्रत्यारोप करणे चुकीचं ठरेल. 

सरकारच असं म्हणणं आहे की फक्त एखाद्या बेसिक रिसर्च करून पुढे जर काहीच इम्प्लिटेशन किंवा ते अँप्लिकेबल होणार नसेल तर असा रिसर्च पॉइंटलेस आहे. बेसिक रिसर्च आणि त्याचे डेव्हलपमेंट याचा आपल्याला समन्वय साधता आला पाहिजे. रिसर्च चा उपयोग गरीब आणि सामान्य जनतेला कसा उपयोगी पडेल यावर काम केले गेल पाहिजे. रिसर्च कमर्शिअलाइज झाले पाहिजेत. संशोधन करणाऱ्या अश्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांनी आता फक्त सरकारी निधी मिळवणे हि आतापर्यंतची सवय सोडली पाहिजे.

गेल्या वर्षी डेहराडून येथे चिंतन शिबिर झाले त्यात त्यांनी हे स्पष्ट सांगितले आहे की संशोधन करणाऱ्या संस्थांनी, फक्त सरकारी निधीवर अवलंबून राहू नये त्यांनी स्वतः प्रॉफिटसाठी काम करून बाहेरून निधी कसा मिळेल ह्यावर काम करावे.

आधीच्या म्हणजे 2016-17च्या तुलनेत 2017-18 साठी  सरकारने बजेट मध्ये किती निधी दिलाय या बाबत काही आकडेवारी पाहूया:
(आपण एकूण बजेटच्या किती टक्के निधी रिसर्च वर खर्च करतोय याचे आकडे मला मिळू शकले नाहीत.)
 
Ministry of Science and Technology मध्ये मुख्य तीन विभाग येतात.
  Department of Science & Technology (DST)
  Department of Biotechnology (DBT) आणि ,
  Department of Scientific and Industrial Research.


 Department of Science and Technology ला  2017-18साठी Rs 4836 करोड निधी देण्यात आला म्हणजे आधीपेक्षा म्हणजे 2016-17ला RS 4493 करोड देण्यात आला होता. हा निधी या वर्षी 7.7% जास्ती दिला गेला आहे.

Department of Biotechnology ला  2017-18साठी  Rs 2222 करोड रुपये देण्यात आले आहे. ह्या आधी म्हणजे 2016-17ला RS 1917 करोड देण्यात आले होते. हा निधी या वर्षी 16% जास्ती वाढवून देण्यात आले आहे.

Department of Scientific and Industrial Research साठी सध्या 2017-18साठी  Rs 4446 करोड रुपये देण्यात आले आहे. या आधी म्हणजे 2016-17ला RS. 4062 देण्यात आले होते. हा निधी या वर्षी 10% जास्ती वाढवून देण्यात आले आहे.

Department of Atomic Energy ला 2017-18 साठी Rs 12,461.2 करोड देण्यात आले आहे. 2016-17ला हाच निधी RS.11383 करोड एवढा देण्यात आला होता म्हणजे आधीपेक्षा ९% जास्ती देण्यात आलेत, म्हणजेच Bhabha Atomic Research Centre (BARC) and Tata Institute of Fundamental Research (TIFR) या संस्थांच्या निधीमध्ये कपात केलेली नाही.

Ministry of Science and Technology, the Department of Atomic Energy (DAE), the Department of Space and the Department of Earth Sciences यांना एकत्रित Rs 34,759.77 करोड रुपयांचा निधी आधीच्या पेक्ष्या 11% ने वाढवून देण्यात आला आहे.

Space Department, ज्याचा मुख्य उद्देश 2018 मध्ये दुसऱ्यांदा चंद्र मोहीम आहे त्यासाठी Rs 9,093.71करोड देण्यात आला आहे गेल्या वेळी म्हणजे 2016-17साठी हाच निधी 8045.28 एवढा दिला होता. म्हणजे 13% जास्ती चा निधी या वर्षी देण्यात आला आहे.

Ministry of Earth Sciences, जे कि वातावरण बदल याचा अभ्यास करते त्याला Rs 1723 करोड देण्यात आले आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2016-17 ला RS.1566 करोड निधी देण्यात आला होता.

शैक्षणिक संस्थेना तर भारी रक्कम देण्यात आली आहे, 2017-18 साठी Rs 79,686 करोड निधी दिलेला आहे , आधी 2016-17 साठी Rs 72,394 करोड देण्यात आला होता. यातून IIT सारख्या संस्थानां Rs 3,000 करोड निधी योजला आहे.

Health ministry साठी 2017-18 ला Rs 48,852 एवढा मोठा निधी देण्यात आलेला आहे. आधी 2016-17 साठी हाच निधी Rs. 39,888 करोड एवढा होता. National AID'S Control Organization (NACO) साठी असलेले प्रोजेक्ट्स आणि निधी कमी करण्यात आले होते, पण 2016-17 साठी NACO ला 1700 करोड देण्यात आले आणि 2017-18 साठी 2000 करोड निधी देण्यात आला आहे.

अश्या संस्था ज्या स्वतः निधी उभा करू शकतात जसे कि The Council of Scientific and Industrial Research (CSIR) अश्या संस्थेचा फंड कमी केला आहे, आणि त्याना प्रोजेक्ट्स साठीचा अर्धा निधी स्वतः मिळवायला सांगितले आहे. बाहेरून फंड आणि ग्रांट मिळवण्यासाठी त्यांना वरिष्ठ मदत करतीलच असेही सांगितले आहे. लॅब चा वापर कमर्शिअल करून त्यातून फंड उभा करून त्यांनी स्वावलंबी धोरण स्वीकारावे. अश्या कामासाठी आम्ही कुठलेही टार्गेट्स त्या संस्थांना देणार नाही. सोबत महिन्याला रिपोर्ट कार्ड सादर करायला सांगितले आहे ज्यामध्ये ते अश्या सरकारी रेसोर्सेस चा कसा वापर करतील, त्याचा कसा उपयोग होणार आहे याची माहिती देण्यास सांगितले आहे.
आकडेवारीत मला कुठेच निधी कपात वाटत नाही, एकूणच मला या बाबतीत सरकारचे धोरण आणि त्यांचे मुद्दे रास्त वाटत आहे.

आमच्या कंपनीचे उदाहरण देतो, आमची प्रायव्हेट कंपनी आहे, आम्ही नॅनो आणि मायक्रो डीव्हाइस फॅब्रिकेट करतो. त्यासाठी आम्ही indian institute of science (iisc) bangalore या संस्थेची लॅब वापरतो , त्यासाठी आम्ही लाखो रुपयाचे बिल भरतो, हि प्रोसेस फक्त 6-7 दिवसाची असते. iiscला लॅब वापरायला देणे हे सोडून काहीच करावे लागत नाही, सगळी कामे आमचे फॅब्रिकेशन इंजिनिर करतात. अश्या अनेक प्रायव्हेट कंपनी आहेत ज्याना अश्या लॅब्स ची गरज असते. अश्या मिळणाऱ्या निधीतून हि संस्था त्यांचे संशोधन निधी गरज भागवू शकते. फक्त सरकारी निधीवर अश्या संस्था किती दिवस टिकतील? यांना कमर्शिअलाइज होणे गरजेचेच आहे.

दुसरे उदाहरण आपल्यासमोर इस्रो चे आहेच, बाहेरील देशांच्या सॅटेलाइट प्रोजेक्ट्स मुळे यांना चांगला निधी उपलब्ध होत आहेच. माझ्या बघण्यात असे अनेक प्रोजेक्ट आहेत जे एक्सटेन्शन मिळवून तेच काम कमी अधिक फरकाने करत राहतात आणि नंतर प्रोजेक्ट बंद करून टाकतात. जो पर्यंत निधी मिळतोय तो पर्यंत काम चालू. अर्थात सर्वच प्रोजेक्ट असे नसतात.

सरकार कडून अश्या प्रोजेक्ट्स ला निधी मिळावा म्हणून एखादा प्रोफेसर किंवा डिपार्टमेंटची लॉबी मोठ्या प्रमाणावर काम करत असते. काही प्रोजेक्ट्स फक्त प्रोफेसरच्या नावावर मंजुर होतात. अश्या सरकारी संस्था , त्याने काम, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यातील अंतर्गत राजकारण खूपच वाईट पद्धतीने सुरु असते. अश्या संशोधन करणाऱ्या संस्थाना प्रोफेशनल, कमर्शिअल होण्याची गरजच आहे हे मलाही मान्य आहे.

(२०१३-१४ च्या बजेट सोबत आताच्या २०१७-१८ बजेटमधील आकड्याचा फरक पाहायचा असेल खालील लिंक वर तपासा :
http://www.thehindu.com/business/Economy/budget-201314-highlights/article4461680.ece  )

Sunday, June 25, 2017

कॉफीतून निर्माण झालेलं अवाढव्य उद्योग साम्राज्य : कहाणी स्टारबक्सच्या उत्पत्तीची!



 व्यवसायात चढ उतार येतच असतो. पण एक वेळ अशी येते कि त्या वेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय तुमच आयुष्य बदलून टाकतो. याला आपण कधी कधी “नशीबाने दार ठोठावणे” असे हि म्हणतो. कधी कधी नशीब पण एखाद्याला भरभरून द्यायला येतं, पण त्याच्याकडे घ्यायला काहीच नसतं, तर दुसरीकडे तुम्ही एक वडापावची अपेक्षा करावी आणि नशिबाने प्रसन्न होऊन 8-10 बालुशे फेकून मारावे अशी अवस्था असते. आज तुम्हाला एका सत्य घटनेवर आधारित अशीच एक स्टोरी सांगतो. कॉफिचा कप घेऊन आराम खुर्चीत किंवा गॅलरीमध्ये बसून ह्या स्टोरी चा आस्वाद घ्या!

हि स्टोरी आहे एका यशस्वी व्यावसायिकाची. व्यवसायामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, एक प्रकार असतो तो म्हणजे 'जे आहे त्यात समाधान मानून जगायचं, जास्तीची अपेक्षा करायची नाही (थोडक्यात रिस्क घ्यायची नाही)' आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे 'सतत नवीन काहीतरी करायचं, वेगळ्या वाटा धुंडाळत रहायचं, धडपडायचं रहायचं. (थोडक्यात रिस्क घेणारे)'. ह्या स्टोरीचे अशीच दोन पात्रे आहेत. हि स्टोरी आहे हावर्ड शुल्ज़ आणि गार्डन बॉकर, जेरी बोल्डवीन, आणि जेव सीग यांची. हि स्टोरी आहे स्टारबक्सच्या उत्पत्तीची आणि कॉफी साम्राज्याची.

1953 मध्ये हावर्ड शुल्ज़ हा न्यूयॉर्क मधील ब्रूकलीन भागात एका गरीब ज्यू कुटुबांत जन्माला आला. घरची परस्थिती गरिबीची असल्याने लहान वयातच तो पेपर टाकणे, हॉटेलमध्ये काम करणे अशी छोटी मोठी कामे करत असत. फूटबॉल चांगले खेळायचा, स्पोर्ट्स मुळे स्कॉलरशीप मिळाली आणि त्याच्यासाठी उच्च शिक्षणाची दरवाजे उघडी झाली. घराण्याच्या इतिहासातील एकमेव ग्रेजुएट असा हा हावर्ड शुल्ज़ 1975 मध्ये "झेरॉक्स " ह्या कंपनीत कामाला लागला. 

 या कंपनीत सेल्स आणि मार्केटिंग चे त्याने 4 वर्ष काम केले. याच दरम्यान त्याचं शौरी नावाच्या मुलीशी लग्न हि झालं होतं. त्यानंतर हावर्ड ने झेरॉक्स कंपनी सोडून "हैमरप्लास्ट" ह्या स्वीडिश कंपनीत जॉबला लागला होता. हि कंपनी स्वयंपाक घरातील उपकरणे बनवत असत. इथं मेहनतीने नोकरी करत तो अल्प कालावधीत अमेरिका प्रभाग प्रमुख झाला.मस्त अशी मोठी नोकरी, रग्गड पैसा, प्रेमळ पत्नी आणि एक सुखी आयुष्य या शिवाय एखाद्याला आणि काय हवं असतं? पण हावर्डची यशोगाथा इथंच थांबली नाही. आता तर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळणाऱ्या वळणावर तो येऊन पोहचला होता. 

सीएटल स्थित एक छोटी "स्टारबक्स कॉफी, टी अँड स्पाइस कंपनी" हि हैमारप्लास्ट कंपनीकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कोन फिल्टर्स विकत घेतं असत. हि कंपनी नक्की एवढ्या फिल्टर्स चं करते तरी काय हे बघायला ते एकदा स्टारबक्स ह्या कंपनीत उत्सुकतेपोटी सीएटल गेला.
1971 ला सुरु झालेली स्टारबक्स हि दहा वर्ष्याची छोटी कंपनी होती. हि फक्त सीएटल राज्यात आपला व्यवसाय करत असत. तीन मित्र म्हणजे लेखक गार्डन बॉकर, इंग्रजी शिक्षक जेरी बोल्डवीन, आणि इतिहास शिक्षक जेव सीगी यांनी ह्या स्टारबक्स ची स्थापना केली होती. त्यावेळी हि कंपनी फक्त कॉफीच्या बी(Bean's) विकायची . 

हावर्ड ला हि कंपनी बघताच क्षणी आवडली. काही दिवसात संस्थापक सोबत ओळखी झाल्यानंतर हावर्ड ने स्टारबक्स मध्ये नोकरी करण्याची इच्छा बोलून दाखवली, स्टारबक्सचे संस्थापक सुद्धा नोकरी देण्याकरीता राजी झाले आणि अश्याप्रकारे हावर्ड स्टारबक्सचा रिटेलचा डायरेक्टर हि झाला. हावर्ड ने स्टारबक्स मध्ये जबरदस्त अशी कामगिरी सुरु केली. 

1983 मध्ये कंपनीच्या कामानिमित्त हावर्ड मिलान (इटली )येथे गेला होता, तिथे त्याने पहिल्यांदा "कॉफी बार" पहिला, आणि तो व्यवसाय पाहून त्याला स्टारबक्समध्ये हि अशी कॉफी ड्रिंक देता येणं शक्य आहे का याची पडताळणी सुरु केली. असे कॅफेबार फक्त कॉफी पिण्याचे ठिकाण नसून लोक एकत्र येऊन गप्पा मारतात, एकमेकांना भेटतात. अमेरिका मध्ये अश्या पद्धतीची कॅफेबार चेन व्यवसाय कोणाचाच नव्हता. हार्वडला ह्या मध्ये मोठा व्यवसाय दिसत होता. स्टारबक्स आतापर्यंत केवळ कॉफी बी विकत होती, त्यातच जर छोटासा कॉफी बार सुरु केला तर कंपनी मोठी कामगिरी करेल अशी त्याची मनीषा होती.

अमेरिकेला पोहचताच त्याने कॉफी बार काढण्याची कल्पना संस्थापकांना सांगितली. ह्या कल्पनेवर संस्थापक एवढे खुश नव्हते, त्यांचं म्हणणं होतं की स्टारबक्स एक कॉफी बी विकणारी कंपनीचं राहू द्यावी पण हावर्ड च्या प्रबळ इच्छेपुढे त्यांनी एका शॉप मध्ये कॉफी ड्रिंक बार सुरु करण्याची परवानगी दिली. हळू हळू स्टारबक्स ची कॉफी लोकांना आवडू लागली, काही दिवसातच शेकडो लोक कॉफीसाठी स्टारबक्स ला भेट देऊ लागली. हावर्ड च्या अपेक्षेनुसार त्याला ह्या व्यवसायात मोठी बाजारपेठ दिसू लागली, पण एवढं होऊन हि स्टारबक्स च्या संस्थापकांच हेच म्हणणं होतं की स्टारबक्स हि एक कॉफी बी विकणारी कंपनी राहू द्यावी. उगाच मोठी कंपनी करून डोक्याला ताप करून घायला नको, आहे तो व्यवसाय ठीक आहे. कॉफी ड्रिंक्स बंद करायला हवं. 

हावर्ड ला कॉफी ड्रिंक बारचा व्यवसाय खुणावत होता, त्याने लागलीच स्टारबक्स ला राजीनामा दिला आणि स्वतःची "टू गिओरनॅल " अशी कॉफी ड्रिंक ची चेन बार सुरु केली. हा कॉफी बार खूपच लोकप्रिय झाला. पुढे 1987 मध्ये स्टारबक्स चे संस्थापक त्यांची कंपनी विकत आहेत अशी खबर हावर्ड ला मिळाली, मग त्यानेच पुढे चक्रे फिरवली आणि स्टारबक्स विकत घेतली. ह्या काळात स्टारबक्सची 11 स्टोअर्स होती आणि हावर्डची स्वतःची 6 स्टोअर्स अशी एकूण 17 कॉफी स्टोअर्स त्याच्याकडे होतीत.
हावर्ड म्हणयचा कि " आम्ही फक्त कॉफी विकत नाही, आम्ही अनुभव विकतो, असा अनुभव कि लोक स्टारबक्समध्ये सारखे सारखे येतील."
लोकांना आरामदायी कित्येक तास बसून तिथे कॉफी घेत गप्पा गोष्टी करता याव्यात म्हणून कॅफेची रचना हि त्याने तशी बनवली होती. 

लोकांच्या समक्ष कॉफी बी रोस्ट करून कॉफी बनवून देऊ लागला, कॉफी बनवण्याची पद्धत एकसारखी ठेऊ लागला ज्यामुळे लोकांना नेहमी त्यांची मन पसंद कॉफी मिळू लागली. स्टारबक्स मधील कर्मचाऱ्यांना तो पार्टनर्स बोलायचा, त्याने सर्व कर्मचाऱ्यांचे हेल्थ इन्शुरन्स काढून दिले होते. स्टारबक्स दर वर्षी जवळपास 30 करोड डॉलर्स हे फक्त कर्मचाऱ्यांच्या हेल्थ इन्शुरन्स वर खर्च करते. हा खर्च त्यांच्या मुख्य रॉ मटेरियल कॉफी बी वर केले गेलेल्या खर्च पेक्षा कित्येक जास्ती आहे. 1992 मध्ये स्टारबक्स चा IPO आणला गेला आणि हि कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी झाली तिथून ह्या कंपनीने मागे वळून पाहिले नाही.

पुढच्या 8 वर्ष्यात त्यांनी शेकडो कॅफे सुरु केले, दर वर्षी नवीन मार्केट, नवीन देशात त्यांनी आपला व्यापार वाढवला. 1992 मध्ये स्टारबक्स चे 165 कॅफे होती, तेच 1999 मध्ये कॅफेची संख्या 2498 झाली होती यावरून तुम्ही कंपनीचा विस्तार कसा झपाट्याने होत गेला याचा अंदाज बांधू शकता. 2000 साली जेव्हा कंपनीचे 3500 कॅफे झालीत तेव्हा हावर्ड ने रिटायर्ड होण्याचा निर्णय घेतला आणि "ओरिम स्मिथ" याला कंपनीचा ceo बनवून सगळी जबाबदारी त्याच्याकडे सोपवून स्वतः चेअरमन झाला आणि इथेच त्याने चूक केली.

हावर्ड बाजूला झाला तसा कंपनी आपल्या मुख्य उद्दिष्टापासून दूर जाऊ लागली. शेअर मार्केट मध्ये अग्रेसर होण्याच्या दृष्टीने दरवर्षी कॅफेची संख्या तर वाढू लागली पण कॉफी ची गुणवत्ता आणि ग्राहकांची सेवेची गुणवत्ता ढासळू लागली. नुकसान होण्याची कल्पना असून सुद्धा नवीन कॅफे उघडण्यात आलीत, कंपनीने कॉफी सोबतच खाद्य पदार्थाच्या सेगमेन्टमध्ये शिरकाव केला, सोबत म्यूजिक सीडी सेगमेन्ट हि सुरु केला जो कि त्यांच्या व्यवसायाच्या पूर्णतः वेगळा व्यवसाय होता , यामुळे कंपनीच लक्ष मुख्य उद्दीष्टा पासून दूर होत गेलं.
याच काळात टेक्नॉलॉजि वाढली, सोशल मीडिया झपाट्याने वाढला, प्रतिस्पर्धी वाढत गेले त्यामुळे कंपनीचा व्यवसाय मार्जिन कमी होत गेला.


2007 मध्ये स्टारबक्स कंपनीचे 15000 कॅफे असून सुद्धा या कंपनीचे आर्थिक आकडे गडगडायला लागले, आणि असे वाटू लागले की आता ही कंपनी बुडीत निघणार, बंद पडणार. तेव्हा हावर्ड ने क्रांतिकारक निर्णय घेतला आणि 2008 मध्ये कंपनीच्या ceo पदावर पुनरागमन केलं. पदभार स्वीकारल्या बरोबरच त्याने झटपट निर्णय घ्यायला सुरुवात केली. सर्वात पहिला त्याने 10,000 स्टोअर्स मॅनेजर लोकांना एका ठिकाणी मीटिंग ला बोलावून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा कशी द्यायची याचे प्रशिक्षण दिले. त्याने स्टारबक्स चे उद्धिष्ट, उच्च गुणवत्तेची कॉफी, आणि ग्राहकांची सेवा यावर लक्ष्य केंद्रित करण्यावर भर देण्यास सांगून कर्मचार्यांच्यात आत्मविश्वास भरला.
त्या नंतर हावर्ड ने तोट्यात चालणारी 600 कॅफे लगेचच बंद करून टाकली. सोबत इतर कॅफेत नवीन लॅपटॉपस्, अद्यावत उपकरणे लावून घेतली. एवढेच नाही तर त्याने जगभरातील स्टारबक्स च्या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित तीन तास कॅफे बंद ठेऊन, परफेक्ट कॉफी कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले. हे खूपच अद्भुत होतं कारण एवढा वेळ कॅफे बंध करणे म्हणजे 3 तास लेबर कॉस्ट कमी होणे जे कि कित्येक लाख डॉलर चे नुकसान होतं. हावर्ड ने कॉफी चे काही नवीन फ्लेवर्स आणून मार्केट वर आपली पकड मजबूत केली. आणि अश्याप्रकारे जी कंपनी बुडत होती तिला त्याने पुन्हा जिवंत आणि यशस्वी करून दाखवली.

आज जवळपास 72 देशात ,2 लाख 38 हजार कर्मचारी आणि 24 हजार कॅफे सोबत हावर्डच्या नेतृत्वात हि कंपनी यशस्वीरीत्या सुरु आहे. कंपनीचं रेव्हेन्यू तब्बल 2 हजार करोडच्या जवळपास आहे. भारतात टाटा समूहासोबत स्टारबक्स कंपनीने करार करून भागीदारीमध्ये स्टारबक्स कॅफे देशभर सुरु केले आहेत.
काळासोबत कंपनीने स्वतःमध्ये बरेचसे बदल केलेले आहेत. 

इथं सांगायचा मुद्दा हा आहे की जर तुम्ही व्यवसायाबद्दल passionate असाल आणि संधी ओळखून योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर तुम्हाला यशस्वी होण्यावाचून कोणीही अडवू शकत नाही, स्वतःही नाही, मग तो व्यवसाय कॉफीचा असो, मसाल्याचा असो किंवा कोणताही छोटा मोठा असो.
                                                         
-नि . मा

Thursday, May 11, 2017

खगोलशास्त्र भीती आणि आवड

खगोलशास्त्र भीती आणि आवड


आपण भारतीय एका महान संस्कृतीचे वारसदार आहोत हे मान्य जरी केले तरी त्यातील कितीतरी चुकीच्या गोष्टी आपण डोळे झाकून फॉलो करतं असतो हे हि मान्य करायला हवं .

खगोलशास्त्राबद्दल माझं असंच अनुमान आहे, आम्हाला जास्तीत जास्त खगोलशास्त्र कशातून माहिती होतं तर ते ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र इत्यादि शास्त्राच्या माध्यमातून. मी जर डॉ. चंद्रशेखर, डॉ जयंत नारळीकर, डॉ नितीन शिंदे यांना वाचले नसते तर मीही खगोलशास्त्र, वैज्ञानिक चष्म्यातून कधीच पहिले नसते. या लोकांच्यामुळे आज मी विश्वाची सफर त्यांच्या लेखणीतून करतोय.

आपला कलच तसा असतो, बघाना, गॅलिलिओ ने 1609 मध्ये दुर्भिणीतून चंद्र, शुक्र, गुरु, सूर्य या ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण केले होते, पण आज 21व्या शतकात तंत्रज्ञान असूनही आपल्यापैकी किती लोकांनी असं दुर्भिणीतून खगोलीय आविष्कार पहिले आहेत? बोटावर मोजण्याइतपत ! इथं आवड तरी कोणालाय म्हणा?
अथांग पसरलेल्या आंतरिक विश्वाच्या पसाऱ्यात आपण मानव खूपच नगण्य आहोत तरीही ग्रह आमच्या आयुष्यावर परिणाम करतात अशी आपली श्रद्धा आहे.

शिकल्या सवरलेल्या लोकांना अजून हि लग्न करायला 36 गुण जुळवायला लागतात. संकष्टी आजही आम्ही चंद्र बघूनच सोडतो, नशीब समजा आपण गुरु ग्रहावर नाही, कारण गुरु ग्रहाला 63 चंद्र आहेत, आपल्या पृथ्वी ला एक चंद्र आहे तर आपण महिन्यातून एकच संकष्टी करतो, गुरु वर असतो तर महिन्याला 63 संकष्टया करायला लागल्या असत्या, म्हणजे दिवसातून दोन उपवास, बापरे! उपवास करणाऱ्या लोकांचं काय झालं असतं ते चंद्रच जाणे !!

सूर्यमालेत सर्वात तेजस्वी असलेला शुक्र ग्रह आम्हाला "शुक्र तारा मंद वारा " किंवा "उगवली शुक्राची चांदणी " या अश्या फिल्मी गाण्यातून जास्ती समजतो.

उघड्या डोळ्यांनी रात्री दिसणाऱ्या शनी ग्रहाला आम्ही वाकड्या नजरेचा ग्रह मानतो. पाण्यापेक्षा हलका असलेला हा ग्रह (पाण्याची घनता 1 gm/cm3 आणि शनीची 0.7 gm/cm3 आहे) आज भल्या भल्यांच्या तोंडचं पाणी पळवतो. एकतर 12 राशीपैकी 3 राशींना साडेसाती लावतो म्हणजे भारतातील 25%लोकांना शनी साडेसाती लागलेली असतेच (हे फक्त भारतीयांना बरका !इतर लोकांना असले मंगळ बिंगळ काही नाही).

अभिषेक आणि ऐश्वर्यासारख्या शिकलेल्या किंवा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांनी कडक मंगल चा सॉफ्ट मंगळ करून लग्न केलं, तिथं आम्ही तुम्ही म्हणजे काहीच नाही.

ज्योतिषानी बदनाम केलेला तांबड्या रंगाचा मंगळ हा एकमेव ग्रहच भविष्यात आपल्याला राहण्याचा आसरा असणार आहे. भविष्यात जर ग्लोबल वार्मिंग, बायो-न्यूक्लिअर युद्ध किंवा पृथ्वीवरील लोकसंख्या वाढलीच तर पहिली धाव मंगळावर करण्याच्या तयारीत असलेलो आपण मात्र पत्रिकेत जरी मंगळ आला की पहिली धाव ज्योतिष्याकडे घेतो.
त्या बिचाऱ्या मंगळाला साडेसात कोटी किलोमीटर एवढ्या अंतरावरून माहित हि नसेल कि त्याची शांती महाराष्ट्रातल्या अमुक गावातील तमुक जोतिष्याने घातलेली आहे !! त्याला हे हि माहित नसते कि त्याची आणि शनीची परस्पर युती घडवून मंगळ शांतही करता येतो , आहे की नाय कमाल !!

राहू केतूला तर आम्ही अमरीश पुरी आणि शक्ती कपूरच समजतो. कालसर्प योग्य म्हणजे महाभयंकर योग. राहू ते केतू असा मोठा साप समजून राहू हे सापाचे तोंड, तर केतू हे त्याचे शेपूट. पत्रिकेतील सर्व ग्रह राहू केतूंच्या एका बाजूला आले तर काल सर्प योग्य. यावर उपाय काय तर नारायण नाग बळी! म्हणजे काट्याने काटा काढणे. च्यायला त्या सापांना सुद्धा माहित नाही कि ते इतके पॉवर फुल्ल आहेत.

अधिक मासाचे खूळ हि असेच, आम्हाला जगासोबत बरोबर येण्यासाठी वर्ष्याला 11 दिवस कमी पडले म्हणून तीन वर्षाने 33 दिवसांची वाढ म्हणजे एक महिना पंचांग वाढवण्यात आले. आता हे नाकारावे तर समस्त जावई लोकांशी वाण नाकारण्यावरून मला शत्रुत्व घ्यावे लागेल.

पृथ्वी स्वतः भोवती फिरते हे सत्य विज्ञान आपल्याला तीसरीपासून सांगतेय तरी आम्ही वास्तू पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण बघून बांधतोय. म्हणजे 24 तासात आपले किचन, बेडरूम, देवघर, टॉयलेट सगळं 24 तासात स्वतः भोवती एक फेरी पूर्ण करतात, मग काय उपयोग आहे दिशा पाहून बांधकाम करायची? तरी ही आपण बांधलेली घरे फोडून परत वास्तुशात्राच्या नियमाने दुरुस्त करत सुटलोय, किती अडाणीपणा हा.

आपण अजून किती आणि कुठवर अश्या अंधश्रद्धा जोपासणार आहोत हे माहित नाही. इथं शिकलेले हि तिथेच आणि अशिक्षित पण तिथेच आहेत.

एका वाचनात आले होते, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, इंग्रजांनी स्वातंत्र्य जाहीर केल्यावर 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 12 वाजता नेहरू ते स्वीकारणार होते पण भारताने रात्री 12 वाजता स्वातंत्र्य स्वीकारू नये असं धर्मपंडितांचे मत होते. का तर त्या दिवशी आमावस्या होती. त्यावर नेहरू म्हणले होते आज स्वातंत्र्य स्वीकारले नाही तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांच्या हौतात्म्याशी हि प्रतारणा ठरेल. हुतात्मे अमावस्या बघून झालेले नाही, काहीही असो, स्वातंत्र्य रात्री 12 वाजता स्वीकारले जाईल.आणि त्यांनी तसेच केले.
एवढा वैज्ञानिक दृष्टीकोन आपण ठेवला असता तर.... !!

असो!! नेहरूंनी हा दृष्टिकोन ठेवला हेही नसे थोडकेच!
 
-नि.मा

Sunday, April 30, 2017

महात्मा बसवेश्वर यांच्या ९१२ व्या जयंती



आपल्या भारताचा इतिहास तसा खूपच रंजक आणि गौरवशाही राहिलेला आहे. अश्या इतिहासात अनेक समाजसुधारक, युगपुरुष होऊन गेले. अश्या महापुरुषांची आजही ह्या जगाला गरज भासत राहते कारण त्यांनी केलेले कार्य हे सहज नव्हते, आज ही भले भले त्यांच्या सारखं कार्य करू शकत नाहीत, असेच एक महापुरुष ९०० वर्षांपूर्वी होऊन गेले ते म्हणजे विश्वगुरु जगतज्योति महात्मा बसवेश्वर. आज त्यांची ९१२ वी जयंती…त्यानिमित्त थोडक्यात त्यांच्या कार्याचा परिचय.

१२व्या शतकामध्ये भारतीय समाज विशेष करून दक्षिण भागातील समाज हा अनेक परंपरा, रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता, भेदभाव, स्त्री दास्यत्व, जातीयता इत्यादींनी त्रस्त झालेला, मरगळलेला होता. अशा परिस्थितीत त्या काळात समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे धाडस महात्मा बसवेश्वरांनी केले. मान, अपमान, कष्ट, टीका सहन करीत त्यांनी प्रस्थापितां विरुद्ध मोठा संघर्ष उभा केला. यासाठीच बरेचजण त्यांना १२व्या शतकातील पुरोगामी तर काहीजण विद्रोही महात्मा असेही म्हणतात.
महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक होते. महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. त्यांनी शोषणविरोधी, भेदभावविरोधी, जातीभेदाविरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवली. महात्मा बसवेश्वरांनी चातुवर्णाला विरोध केला. वर्णभेद, जातीभेद नुसतेच नाकारले नाही तर त्यावर त्यांनी सडकून टीकाही केली.

महात्मा बसवेश्वर यांचा जन्म ११०५ मध्ये बागेवाडी (जि. विजापूर) कर्नाटक येथे वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाला.  (जन्म तारीख आणि वर्ष या विषयी मतभेद आहेत पण खूप संशोधना अंती इतिहास संशोधक डॉ पी बी सावंत यांनी ११०५ हेच वर्ष ठरवले आहे)
दरसाल त्याच दिवशी देशभरात बसवजयंती साजरी केली जाते, खास करून कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार, बसव कल्याण (कर्नाटक) येथे ही जयंती जोरदार साजरी केली जाते. १९१३ मध्ये कर्नाटक गांधी म्हणून ओळखले जाणारे हर्डेकर मंजप्पा यांनी दावणगेरे (कर्नाटक) येथे पहिली सार्वजनिक बसव जयंती साजरी केली.
महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धता निर्माण करण्यासाठी त्यांनी समाजाला “कायक वे कैलास” आणि “दासोह” अश्या दोन क्रांतिकारक संकल्पना दिल्या.

मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना हे त्यांच्या कायक वे कैलास सिद्धांताचे सार होय. शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे. कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हे हीन दर्जाचे नाहीत, असे सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढविली. कायक हे केवळ पैशासाठी सांगितलेले नाही. तसेच ते कर्मसिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसायस्वातंत्र्य देण्यात आलेले आहे.
श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी, ही विचारसरणी (दासोह ) मांडल्यामुळे बसवेश्र्वरांची वृत्ती समाजवादी, समतावादी होती, असे दिसून येते. दासोह सिद्धांतात आपण कमावलेले धन केवळ स्वतः पूरते न वापरता त्याचा समाजासाठी उपयोग करण्याची संकल्पना त्यांनी मांडली.

बसवेश्र्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना, विशेषतः ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला.

बसवेश्वरांच्या काळात समाजव्यवस्थेत स्त्रीला शुद्र, बहिष्कृत समजले जात असे. स्त्रीयांवर अन्याय होत होता, म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य केले. स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क दिले. स्त्रियांची अशुद्धतेच्या कल्पनेतून आणि पंचसुतका पासून सुटका केली.
तत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांच्या पुढाकाराने १२ व्या शतकात घडला. मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला.
असा आंतरजातीय विवाह तो ही १२ व्या शतकात हे खूपच क्रांतिकारक आणि धाडसी होतं कारण आजही म्हणजे ९०० वर्षांनंतरही आपल्या समाजाची असा विवाह स्वीकारण्याची पूर्ण मानसिकता झालेली नाही.

सवेश्र्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली शिवानुभवमंटप म्हणजेच अनुभवमंटप ही संस्था जागतिक धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. हे त्या काळातील पहिले लोकशाहीचे संसद होते. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण येथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. ही चर्चा लयबद्ध गद्यातून होत असे. तत्कालीन शिवशरण-शरणींची अशी वचने पुढे संग्रहीत करण्यात आली. मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. वचन साहित्यातून त्यांनी समाजात प्रबोधनरूपी विचार पेरले.


दोन वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लंडन मध्ये थेम्स नदीच्या काठी बसवण्यात आलेल्या बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या अनावरन संध्येच्या भाषणात याच गुणांचा जगासमोर जाहीर गौरवही केला होता.
 आता परत हे मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्या नुकतेच २३ भाषेत रूपांतरित झालेलं असून येत्या २८ एप्रिल २०१७ रोजी बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे “वचन साहित्य” देशाला समर्पित करण्यात येत आहे.

 -नि. मा. 

Sunday, April 9, 2017

"ऊन जरा जास्तच आहे, दरवर्षी वाटतं "


"ऊन जरा जास्तच आहे, दरवर्षी वाटतं "

 



 दरवर्षी जसजसा एप्रिल-मे जवळ येतो तेव्हा उन्हाळा जरा जास्तीच आहे असं सगळ्यांनाच वाटतं. हिवाळ्यात हवा हवा असणारा सूर्य मात्र उन्हाळ्यात नको नको वाटतो, आमच्या काही फेसबुक मित्रांनी उन्हाळाचं रद्द व्हावा अशीही गमतीने मागणी केली होती.

अभ्यासायला सूर्य तसा खूप छान तारा आहे, मला जाम आकर्षण आहे याच, युनिव्हर्स मध्ये अद्भुत आहे, सर्वांनाच माहित आहे, सूर्य आहे म्हणून तर पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे.
या उन्हाची गम्मत सांगतो आज ह्या क्षणाला जो उन्हाचा चटका लागतोय, जो प्रकाश , उष्णता आपल्याला मिळतेय त्याची उत्पत्ती हि लाखो वर्ष्यापूर्वी झालेली असते.

सूर्याच्या मध्य केंद्रभागेत निर्माण होणारी ऊर्जा 'प्रकाश आणि उष्मा ' याच्या रूपाने बाहेर पडते (याला फोटॉन म्हणतात). सूर्य एवढा मोठा आहे की ही ऊर्जा बाहेर पृष्ठभागावर यायला तब्बल 1लाख 70हजार एवढे वर्षे लागतात.

सूर्याच्या विशालतेची अजून एक गोष्ट सांगतो, आपण मानवाने आतापर्यंत ऊर्जेसाठी जो मोठा प्रकल्प बांधलाय त्यातून आपण फक्त 22 हजार 500 मेगावॉट ऊर्जा निर्मिती करू शकतोय.
सूर्याची ऊर्जा किती आहे माहीत आहे का? 38 हजार करोड मेगावॉट तेही प्रति सेकंदाला सूर्य निर्माण करतोय   म्हणजे सूर्य  किती विशाल ऊर्जा निर्माण करतो ते पहा , आपल्याला हे सर्व फुकट देतोय सूर्य.

पण हा सूर्य खूप काळ असंच ऊर्जा देत राहील का? सूर्य काय आहे, कसा आहे , त्याचे आयुष्य किती आहे? हे हि आपण पाहू.
शास्त्रज्ञ असं सांगतात की सूर्याचा जन्म 4.5 अरब वर्ष्यापूर्वी झालाय. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम यापासून बनलेला मोठा गोळा आहे. याचे बाह्य आवरण हे हायड्रोजन, हेलियम, लोह, सिलिकॉन, सल्फर, मॅग्नेशियम, ऑक्सिजन, कॅल्शियम, क्रोमियम या तत्वांपासून बनलेलं आहे
सूर्याचं मध्यकेंद्रिय (core) तापमान 1 करोड 56 लाख ℃ आहे आणि बाह्य आवरणाचे तापमान 6000℃ आहे .
शास्त्रज्ञ काही वर्ष्यापूर्वी असं मानत होते की, सूर्य सामान्य इंधना सारखं जळत राहतोय, पण मग त्यांना एक प्रश्न पडायचा कि हे असं असेल तर इंधन संपत का नाही? 1920 मध्ये ह्यावर अजून अभ्यास केल्यावर त्यांना कळालं कि हि एक Nuclear Fusion प्रोसेस आहे. या nuclear fusion वर सध्या जोरात काम चालू आहे, हे काम यशस्वी झालं की मानव जातीला कधी न संपणार्या इंधनाचा स्रोत मिळेल. सध्या युरोप, चीन, जपान, रशिया, अमेरिका आणि भारत हे संयुक्तिकपणे यावर काम करत आहेत.
( हि तीच प्रोसेस आहे ज्याच्या आधारे हायड्रोजन बॉम्बचं  काम चालतं) .

सूर्याच्या मध्यभागी हायड्रोजन कण प्रचंड दबावाखाली असतात. यां कणांची एकमेकांशी टक्कर होऊन हेलियम जन्माला येते. म्हणजे प्रत्येक सेकंदाला 6570लाख टन हायड्रोजनच6530लाख टन हेलियम मध्ये रूपांतर होतं , या प्रोसेस मध्ये जवळ पास 40 लाख टन हायड्रोजनच रूपांतर होतच नाही, त्याच रूपांतर ऊर्जेत होत. हीच ऊर्जा अवकाशात चारीबाजूला पसरली जाते.


संशोधक असं सांगतात की ही सूर्याची प्रोसेस अजून 5 अरब वर्ष चालेल, त्यानंतर सुर्यामधील हायड्रोजन समाप्त होईल, त्यामुळे कोअर तापमान प्रचंड वाढेल ,यामुळे सूर्याचा आकार आहे या पेक्ष्या 100 पटीने वाढेल (याला red giant म्हणतात) असं झालं तर सूर्य पहिला बुध आणि शुक्र या ग्रहांना खाऊन टाकेल आणि मग त्यानंतर आपली पृथ्वी. पण तो पर्यंत आपल्या पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टीचा विनाश झालेला असेल. तिथून पुढे हजारो वर्षे सूर्यात फक्त हेलियम शिल्लक राहिलेलं असेल. मग ते हेलियम कार्बन मध्ये रूपांतरित होईल, त्यामुळे सूर्याचा आकार अजून वाढेल. हे होत असताना त्याच्या बाह्य आवरणाचे तुकडे पडायला सुरुवात होऊन तो शेवटी पृथ्वी एवढा गोळा शिल्लक राहील. आता त्याची ऊर्जा एवढी असेल की ती मोजनेही शक्य नसेल. सूर्य फक्त पांढरा तारा म्हणून शिल्लक राहिल. त्याचे तापमान असेच वाढत राहून पुढे तो जळून जळून कोळश्यासारखा होईल आणि अश्या प्रकारे सूर्याचा अंत होईल.

हे लगेच होणार नाही, हे पाहायला आपण जिवंत हि नसू. हे व्हायला 5 अरब वर्ष लागतील.
सुर्यासारख्या कित्येक ताऱ्यांचा अंत झाला आहे आणि नव्याने जन्म हि झाला आहे. अवकाशात हि आरंभ आणि अंत ची क्रिया अशीच अविरतपणे चालू रहाणार आहे.

-नितीन माळी