Tuesday, June 28, 2016

अतृप्त



मन सारखं कुढत राहतं
तुला  भेटायला बोलवावं,  की नको बोलवावं म्हणून
एकटंच स्वतःशी भांडत राहतं

कधी कधी विचार येतो
तुलापण मला भेटावं,  असं वाटत  असेल का?
प्रेम नाही पण तीच ओढ
अजून तुझ्यात  शिल्लक राहिली असेल का?

ह्या शापित  आयुष्याचा गळा घोटावा,
असे वाटत असून ही मी आयुष्याचा तमाशा  बघत आहे,
कारण एकदा तरी  तू "इथं " भेटशील ,
माझ्याशी आपुलकीनं बोलशील,
मला माफ करशील  अशी आजही आशा आहे.

पण वेडे, जास्ती वेळ  लावू नको,
एकेकाळी तुज्यावर अधिराज्य गाजवणारा मी,
आता  तुझी वाट पाहून
पाहून थकलोय,
एवढ्या वर्ष्याने आता तुझा चेहराही मी विसरलोय,

हे शेवटचं बोलवणं समज ,
जर वाटलेच भेटावे तर,
पूवीच्या आपल्या भेटायच्या ठिकाणी नक्की ये,
मी तिथेच तुझी वाट पाहत,
गुलमोहरच्या झाडाखाली बसलेला दिसेन,

मग मला,
शेवटचा स्पर्श कर आणि
हळूच मिठीत घे. 
डोळे बंद होण्याआधी तू  आली आहेस,    
एवढी आठवण करून दे.

मग बघ, मी म्हणाल्या प्रमाणे
तुझी माझी ती शेवटचीच भेट असेल,
तुझ्या सोबत असून ही, तेव्हा मी तुझ्या सोबत नसेल.
 
तू आज ये, उद्या ये, वर्ष्याने ये, सात जन्माने ये 
मी इथेच तुला भेटेन,
नाही आलीस तर, जीव मात्र तसाच तेवत ठेवेन
 
आयुष्यभर झालेल्या कोंडमार्यावर
 शेवटची  फुंकर मारून  जा,
नाही म्हणू नकोस ,
शेवटी सोबत 'आपल्या' आठवणी देऊन जा.



  

Saturday, June 18, 2016

पाऊस पाणी‬ (चंकोबा)



आमच्याकडे पाऊस वेळेत पडेना किंव्हा दुष्काळ सदृश परस्थिती झाली कि वरूणदेवाला प्रसन्न करायचे विविध प्रकार होतात. पाऊस-पाणी मागणे(काही लोक चंकोबा म्हणतात ह्याला ), गाढवच लग्न लावणे, जो पर्यंत पाउस पडत नाही तो पर्यंत महादेवाला मंदिरात पाण्यात बुडऊन ठेवणे असे बरेच प्रकार सुरु असतात. परंपरागत लोकांच्या समजुती होत्या, आजही बर्याच खेड्यात किव्हा गावी असे प्रकार सर्हास चालतात. 

आम्ही लहान होतो तेव्हा ह्यातला असाच एक प्रकार खूप प्रसिद्ध होता तो म्हणजे पाऊस-पाणी मागणे म्हणजे चंकोबा करणे. रात्री ८ नंतर मोठी बुजुर्ग लोक  १०-१२ वयोगटातील मुलांना एकत्र करून त्यातला एकाला संपूर्ण नग्न करून डोक्यावर एक पाट द्यायचे, त्यावर एक खोटा चिखलाचा वरूणदेव बनवायचे , मग आम्ही सर्व त्या मुलाला घेऊन प्रत्येकाच्या दारात जाऊन ,

"पाऊस पाणी, आबाळ दानी, आभाळ भरलयं पाण्यानं, कणगी भरल्या दाण्यानं" 

असे म्हणायचो , मग घरातल्या बायका तांब्याभर पाणी आणि नैवेद्य म्हणून भाकरी भाजी आणायच्या, पाणी पायावर घालायचा आणि नैवेद्य आम्हाला द्यायच्या, आम्ही तो पिशवी मध्ये भरायचो. अस करत आम्ही सगळी गल्लीभर पाऊस पाणी मागत फिरायचो. सगळं फिरून झालं की शेवटी एका ठिकाणी मोठ्या अंगणात एकत्र जमायचो , पिशवीत जमलेला नैवेद्य वरूणदेवाला दाखऊन, उरलेला सर्व आम्ही तो अंगणात बसून खायचो.
 
नंतर नंतर मुले लाजायला लागलीत , म्हणून मग जेवायचे ताट तोंडासमोर पकडून(कोण आहे ते कळू नये म्हणून ) पाऊस पाणी मागायला लागले, नेहमी सारखे घरातल्या बायका तांब्याभर पाणी आणि नैवेद्य म्हणून भाकरी भाजी आणायच्या, तांब्याभर पाण्याने त्या पोराला आंघोळ घालायचे, पाणी पडत असताना तो पोरगा गोल गोल फिरणार आणि बाकी चे जोर जोरात,
 
"पाऊस पाणी, आबाळ दानी, आभाळ भरलयं पाण्यानं, कणगी भरल्या दाण्यानं"  असे ओरडणार . 

आमचे बुजुर्ग, गावातले लोक सांगतात कि एक वर्षी असाच दुष्काळ पडलेला, लोकांचे खूप हाल झाले होते तेव्हा एका बाई ने पाऊस पाणी मागितले होते, त्यासाठी गावची लाईट बंद केली होती , त्या वर्षी पाउस चांगला पडला होता म्हणे !! अर्थातच ह्या लहानपणी ऐकीव गोष्टी होत्या पण पावसा प्रति  त्यांची ह्या प्रथेवर किती श्रद्धा होती हे कळते.

आत्ता असे पाऊस पाणी मागायचे प्रकार कमी झालेत पण अजूनही बर्याच ठिकाणी पाऊस पडावा म्हणून असले नाना तर्हेचे प्रकार आजही सुरूच आहे. दोन दिवसा पूर्वी अशी घटना कर्नाटक मध्ये घडली त्याचा किती बाऊ केला गेला , आताच्या लोकांना हे अमानुष, मागासलेले वाटते. ह्यावर ब्रेकिंग न्यूज बनते, अश्या प्रथांना नावं ठेवली जातात. आता मी ह्या गोष्टीचे समर्थन नाही करत की हे किती योग्य आहे आणि अयोग्य आहे ते. काळानुसार काही प्रथा नक्कीच बदलायला हव्यात. पण ह्या प्रथा आपल्याच होत्या आणि अश्या समजुती जायला अजून वेळ लागणार आहे.